नागपूर - महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ शिक्षा मिळावी याकरता आंध्रप्रदेश सरकारने तयार केलेल्या दिशा नावाच्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन हैदराबादला गेले होते. त्यांनी दिशा कायद्याची माहिती घेतली. यासाठी ५ अधिकाऱ्यांचे एक पथक नेमण्यात आले असून ते 7 दिवसात गृह मंत्रालायलात अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर तो अहवाल कॅबिनेट समोर ठेवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात महिलांवरील वाढता अत्याचार आणि हल्ल्यानंतर आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी याकरिता दिशा नावाच्या कायद्याप्रमाणे आपल्या राज्यातही असाच एक कायदा अंमलात यावा, अशी मागणी जोर धरत होती. यावर आज(गुरुवार) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेश येथे जाऊन या कायद्यातील बारकावे समजून घेतले. त्यांच्यासमवेत गेलेल्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी ५ अधिकाऱ्यांचे पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक ७ दिवसात अहवाल सादर करणार आहे. यानंतर, कॅबिनेटमध्ये हा अहवाल सादर करून अधिवेशनात चर्चा घडवून आणून राज्यात लवकरच नवा कायदा लागू करू, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात आता काय पावलं उचलते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.