नागपूर- नागपूर शहरांमध्ये कोरोना बधितांचा मृत्यू मोठ्या संख्यने वाढत आहे. यात रुग्णांना खाटा मिळत नसून दुसरीकडे रुग्ण वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. या परिस्थितीत शहरातील मेयो, मेडिकल तसेच खासगी रुग्णालयातील खाटांची संख्या युद्धस्तरावर वाढविण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजच्या बैठकीत दिले. विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले आहे.
पुढील कोरोनाची परिस्थिती पाहता 15 दिवस जिकरीचे
कोरोना मृत्यू संख्येतही भर पडत आहे. पुढचे पंधरा दिवस अतिशय जिकरीचे असल्याच्या वैद्यकीय सूचना आहे. अशावेळी नागपूर महानगर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला. यावेळी त्यांनी खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन व औषधींची उपलब्धता, खासगी दवाखान्यावरील नियंत्रण, चाचण्यांची सद्यस्थिती आणि ग्रामीण व शहरी भागातील लसीकरणाचा आढावा घेतला. यासोबत नागपूर शहराला ऑक्सिजनचा पुरवठा सुव्यवस्थित होण्यासाठी यावेळी बैठकीत अन्न व औषधी विभागाच्या आयुक्तांना निर्देशित केले.
30 मार्चनंतर पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल
शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. रस्ते आणि बाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. राज्य सरकारने 15 एप्रिलपर्यंत सायंकाळी आठ ते सकाळी सातपर्यंत जमाव बंदी जाहीर केली आहे. 31 मार्चपर्यंत शहरात स्थानिक स्तरावरचे बंदीचे आदेश आहेत. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. नागपूर शहर व जिल्ह्यामधील कोरोना काळातील बंदी संदर्भातील निर्णय 30 तारखेनंतर घेतला जाईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.
दर दिवसाला वाढणार 30 खाटा, सोमवारपासून होणार सुरुवात
या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन ठिकाणी खाटांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सोमवारपासून दर दिवसाला 30 खाटा वाढविण्याची तयारी महाविद्यालयाच्या प्रशासनाने दाखविली आहे. यावेळी अधिष्ठाता सोबत चर्चा करत वैद्यकीय महाविद्यालयातील खाटांची संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले. तसेच मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने यावर नियोजन वरिष्ठ पातळीवर करणार असल्याचे म्हणालेत. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे अन्य आजाराच्या फक्त गंभीर रुग्ण मेडिकलमध्ये घेतले जात असून सर्व नॉन कोविड वार्ड कोविड वार्डात रूपांतरीत करण्याचेही त्यांनी यावेळी सुचविले.
लसीकरण मोहीमेला लसीकरण द्या
नागपूर ग्रामीण भागामध्ये 55 टक्के लसीकरण झाले आहे. शहरी भागांमध्ये जवळपास 35 टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाशिवाय कोरोना युद्ध जिंकता येणार नाही. त्यामुळे यासंदर्भात अधिक गतिशील होण्याबाबत त्यांनी जिल्हा व महापालिका प्रशासनाला यावेळी निर्देशित केले. तसेच गेल्या काही दिवसात महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवित खासगी रुग्णालयात जवळपास साडेतीन हजार खाटांची उपलब्धता केली आहे. खासगी रुग्णालयालाही भासणाऱ्या ऑक्सिजनच्या उपलब्धतेची अडचण त्यांनी सांगितली. गृह अलगीकरणात असणारे बाधित घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. सुपरस्पेडर असणाऱ्या घटकावर देखील लक्ष वेधण्याची गरज आहे. यावेळी पोलीस विभागाचा देखील त्यांनी आढावा घेतला राज्य शासनाचा कोविड प्रोटोकॉल प्रमाणे पोलीस विभागाने कार्य करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.
हेही वाचा -बुरा न मानो होली है..!कोरोनाच्या संकटावर पोलिसाने दिला वैदर्भीय कवितांचा तडका