नागपूर -'सध्या सायबर गुन्हे आणि सायबर हल्ले वाढले असून त्यासंदर्भात सावध राहण्याची गरज आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना खासगीत विचारा, मागे महाराष्ट्रात घडलेला विजेचा ब्रेकडाऊन कशा पद्धतीने घडला होता. पोलीस विभागातील सायबर एक्स्पर्टसनी ऊर्जा विभागाला त्याबद्दल सर्व माहिती दिली आहे,' अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. नागपूरमध्ये पोलीस महासंचालक शिबीर कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
सायबर विभाग होणार अत्याधुनिक -
सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी राज्य सरकार 900 कोटी रुपयांचा एक प्रकल्प राबवणार आहे. यामध्ये सायबर गुन्हे विभाग अत्याधुनिक केला जाणार आहे. या माध्यमातून सायबर हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
ऑक्टोबर २०२०मध्ये मुंबईत झाला होता वीजपुरवठा खंडित -
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराला वीजपुरवठा करणाऱ्या पावर ग्रीड मध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल तीन तास मुंबई विना विजेची चालत होती. याचा थेट परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झाला होता. सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पर्यंत मुंबईचा वीज पुरवठा हा टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आला होता. मुंबईमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली होती. वीजपुरवठा खंडित होण्याचा हा प्रकार सायबर हल्ला असल्याचा संशय व्यक्त झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले होते.
देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला -
याच कार्यक्रमात बोलताना अनिल देशमुखांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करत टोलाही लगावला. सध्या नागपुरात जे काही उद्घाटन आम्ही करतो आहे. ते सर्व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर आणि पूर्ण झाले आहे. त्यामुळे आम्ही जरी उद्घाटनाची फीत कापत असलो तरी त्याचे खरे श्रेय फडणवीस यांचे असल्याचे देशमुख म्हणाले. सरकारे येत राहतात आणि जात राहतात. मात्र, कामे थांबायला नको. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारने २ वर्षे आम्ही केलेल्या कामांचे उद्घाटन केले, असेही अनिल देशमुख म्हणाले.