नागपूर - '...माझ्या जीवनाचा सत्यानाश झाला, मी जगून काय करू,' असे पीडित तरुणीने म्हटले असल्याचे तिच्या आईने सांगितले. हिंगणघाट येथील नंदोरी चौकात तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यावेळी रुग्णालयात नेत असताना पीडितेने तिचे दु:ख व्यक्त केल्याची माहिती आहे.
माहिती देताना पीडितेची आई हिंगणघाटमध्ये तरुणीवर पेट्रोल पेट्रोल टाकून जाळण्यात आले. या घटनेत पीडिता ही गंभीररीत्या जखमी झाली, तिचा चेहरा पूर्णपणे भाजला असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. 'या जगण्याला आता काही अर्थ उरला नाही' मी जगून काय करू, असे पीडितेने म्हटल्याचे तिच्या आईने सांगितले.
हेही वाचा - '...त्यालाही पेट्रोल टाकून जाळा, पीडितेच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया'
आरोपी विक्की नगराळे हा तिला वारंवार त्रास द्यायचा. ही बाब पीडितेने ३ महिन्याआधी आई-वडिलांना सांगितली होती. यानंतर, तिच्या वडिलांनी विकीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही आरोपी हा पीडितेला सतत त्रास द्यायचा. यातच सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. दरम्यान, काहींनी तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले. पुढील उपचाराकरता तिला नागपूर येथे हलवण्यात आले. या हल्ल्यामध्ये पीडिता सुमारे ३५ टक्के भाजली आहे. यामध्ये तिचा चेहरा, डोळे आणि मान गंभीररित्या भाजले गेले आहेत. पीडितेची वाचा जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढे कदाचित तिची दृष्टीही जाऊ शकते, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड :'माझ्या मुलीला होणाऱ्या वेदना आरोपीला द्या'