Highest Temperature : विदर्भात सूर्य कोपला; कमाल तापमान 45 डिग्रीच्या जवळ, अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद - अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
भारतीय हवामान विभागाच्या वतीने मार्च आणि मे या दोन महिन्यात उन्हाचा चांगलाच फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली होती. सध्या देशाच्या सगळ्याच भागात प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सरासरी तापमानात वाढ होऊन पारा 45 अंशावर गेले आहे. तर नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट घोषित करण्यात आली आहे.
विदर्भात तापमान वाढले
By
Published : May 15, 2023, 9:23 PM IST
नागपूर: देशाच्या बहुतांश भागांमध्ये एप्रिल आणि मेमध्ये तीव्र उन्हाचा फटका बसत आहे. सध्या विदर्भात सूर्य अक्षरशः कोपल्याचे चित्र आहे. शनिवारपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्याचे तापमान 42 अंशाच्यावर गेले असून, अकोल्यात रविवारी सर्वाधिक 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारी काही अंशी दिलासा मिळाला असला तरी उद्यापासून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
तापमानाने घेतली उसळी: अकोला, अमरावती आणि वर्धा येथे उच्चांकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवस तापमानात अशीच वाढ कायम राहणार असल्याचा हवमान खात्याने अंदाज वर्तविला आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. एप्रिल महिन्यात केवळ एकच दिवस तापमानाचा पारा 42 अंशावर गेले होता. त्यानंतर आता दहा मे पासून उन्हाचे चटके बसायला लागले आहे. शनिवारी 42 अंशावर गेल्यावर रविवारपासून तापमानाने उसळी घेतली आहे.
रोज सरासरी दीड डिग्रीची वाढ: नागपूरच्या सरासरी तापमान 1.6 अंश सेल्सिअसने वाढ होत, तापमान 44.3 अंशावर गेले आहे. तर अकोला येथे 45.5 तर, अमरावती येथे 45.4 अंश एवढ्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट घोषित करण्यात आली आहे. पुढील काही दिवस कमाल तापमान स्थिर किंवा चढते राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
रस्त्यावर शुकशुकाट: गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. रस्ते ओस पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एरवी गर्दीने फुललेले रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे.