नागपूर -भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशु कक्षात असलेल्या अतिदक्षता विभागाला आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु या घटनेला बारा तास झाल्यानंतर भंडारा येथे जाण्याकरिता पालकमंत्री विश्वजीत कदम नागपूर विमानतळावर दाखल झाले होते. तुम्हाला जायला उशिर का झाला, यासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता, ही घटना रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आणि मला सकाळी ७ च्या सुमारास या संदर्भात माहिती मिळली, सकाळपासून मी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, असे ते म्हणाले.
कदम हे सर्वात आधी पोहोचणे अपेक्षित होते -
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम हे सर्वात आधी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ते कालपासून सांगलीला असल्यामुळे त्यांना आज भंडारा येथे पोहोचण्यासाठी उशीर झाला. मात्र तोपर्यंत मृत्यू झालेल्या दहा चिमुकल्यांच्या कुटुंबियांना त्यांचे पार्थिव शरीर सोपवण्यात आले होते. काही ठिकाणी तर अंत्यसंस्काराची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली असली, तरी संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी या कठीण प्रसंगी या बालकांच्या आईवडिलांना धीर देणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने पालकमंत्री सर्वात शेवटी घटनास्थळी दाखल झाल्याने पीडित आई-वडिलांनी न्याय मागाचा तरी कुणाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.