नागपूर:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आहे. नागपुरातही आंबेडकर जयंती धडाक्यात साजरी करण्यात आली. आज सकाळपासून दीक्षाभूमीवरही हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी दाखल झाले होते. तसेच शहरातील संविधान चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागपूरकर दाखल झाले होते. सकाळी पवित्र दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
दीक्षाभूमीचा इतिहास: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रेष्ठ अशा मानवतावादी बुद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली गेली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभरण्यात आला होता. मात्र, ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली, अशी भावना आंबेडकरी अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची 14 एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर 1978 साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, संपूर्ण बांधकाम 2001 साली पूर्ण करण्यात आले.