नागपूर - गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या रणधुमाळीला अखेर आज ब्रेक लागला. निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे, संध्याकाळ होताच प्रचार तोफा थंडावल्या. निवडणुकीत नागपुरातील सर्वच दिग्गज नेत्यांचे सर्वस्व पणाला लागले आहे. यात काँग्रेसकडून अभिजीत वंजारी, तर भाजपकडून संदीप जोशी यांनी जोरदार प्रचार केला. शिवाय विदर्भवादी नितिन रोंघे व इतरही अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात आला.
उमेदवारांनी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी जो माध्यम मिळेल त्याचा अवलंब करत आपला प्रचार केला. नागपूर विभागातून पदवीधर निवडणुकीसाठी एकून सहा जिल्हे आहेत. त्यामुळे, प्रत्येक उमेदवार या सहाही जिल्ह्यात पोहोचण्यासाठी धडाडीने प्रयत्न करत होता. यात आपापल्या क्षमतेनुसार सगळ्याच राजकीय पक्षांनी नियोजन करत प्रचार केला.
निवडणुकीत काही मोजकीच नावे चर्चेत
निवडणुकीत काही मोजकीच नावे सध्या चर्चेत आहे. भाजपकडून संदीप जोशी, काँग्रेसकडून अभिजीत वंजारी, तर विदर्भवादी नितिन घोंगे यांच्यासह अपक्ष म्हणून नितेश कराळे ही नावे सध्या चर्चेत आहेत. असे असले तरी गेल्या ५८ वर्षापासून नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपकडे राहिला आहे. त्यामुळे, यावर्षीही तो भाजपकडेच राहावा यासाठी भाजपचे सर्वच मोठे नेते प्रचारात रंगल्याचे पाहायला मिळाले.