नाशिक - शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निंदनीय आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी सरकार काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील गारगोटी संग्रहालयास भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी प्रसारमाध्यमाना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याबद्दल प्रश्न विचारताच कोश्यारी यांनी मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत असून, ते समजदार व्यक्ती आहेत. शरद पवार स्वतः प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यामुळे या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही, असे म्हटले. 8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.