नागपूर -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. बाजारपेठा आणि अन्य ठिकाणी होणारी गर्दी पाहता कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विकेंड बंदचा निर्णय घेण्यात आला, याला नागपूरकरानी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद दिल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. ते सीताबर्डी येथे बंदचा आढावा घेण्यासाठी आले असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त राधकृष्णन बी, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले की, नागपूरकरांचा कोरोनापासून जीव वाचवणे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. ते बजावत असताना काही कठोर पावले उचलावे लागतात. पुढील काळात कोरोना वाढल्यास आणखी कठोर पावले उचलावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
विद्यार्थ्यांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था
कोरोनाच्या परिस्थितीवर विभागीय आयुक्त लक्ष ठेवून आहे. ते दररोज आढावा घेत आहे. पुढील काळात परिस्थिती नुसार निर्णय घेतला जाणार आहे. रविवारी शहरात स्पर्धा परीक्षा आहे, यामुळे बाहेर जिल्ह्यातून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी येणार आहेत. त्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.