नागपूर - गिट्टीखदान पोलिसांनी गांजा तस्करीची मोठी खेप पकडली आहे. पोलिसांनी 28 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एक कार आणि चार लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फिरोज अन्सारी वल्द नूर मोहम्मद आणि शुभम उर्फ ढग्या करलुके यांचा सामावेश आहे. ते दोघेही गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. त्यांनी हा गांजा रांचीहून आणल्याची कबुली दिली आहे.
नागपूर पोलिसांची कारवाई
नागपूर गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजासह एमडी ड्रग्स तस्करांच्या टोळीतील अनेक सदस्यांना अटक केल्यानंतर नागपूरात ड्रग्स तस्करी वाढल्याचे दिसून आले. आता गिट्टीखदान पोलिसांनी गांजा तस्करी उघडकीस आणली आहे. गिट्टीखदान पोलीसांचे पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना झारखंड पासिंग असलेली एक कार संशयास्पद रित्या फिरताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी कार थांबवून कारमध्ये असलेल्या दोघांची विचारपूस केली. तेव्हा त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पोलिसांनी कारची झडती घेतल्यावर त्यात प्लास्टिक बॅगमध्ये गांजा आढळला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. नागपूर शहर हे आता गांजा आणि ड्रग्ज तस्करीचे केंद्र बनत असल्याने शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.