महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, काय म्हणाले एकनाथ शिंदे? - वैद्यकीय महाविदयाल

Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Centre : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नागपूरमध्ये गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Centre
Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Centre

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 12:14 PM IST

डायग्नोस्टीक सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर Gangadharrao Fadnavis Memorial Diagnostic Centre : गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरमध्ये आता अत्याधुनिक पद्धतीनं वैद्यकीय निदान उपलब्ध होत असल्यामुळं आजारांचं निदान अचूक होणार आहे. त्यामुळं गरीब रुग्णांचे प्राण वाचवणं शक्य होईल. सेवाभावीवृत्तीनं सुरू होणारा रुग्ण सेवेचा हा यज्ञकुंड अव्याहतपणे सुरू राहील, असा विश्वास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. ते शुक्रवारी सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनच्यावतीनं पावनभूमी इथं गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

जिल्हा स्तरावर वैद्यकीय महाविदयालय सुरू करण्याचा निर्णय : यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामान्य माणसाला न्याय देण्याचा निर्णय घेताना आरोग्य सेवेला प्राधान्य दिलय. राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. रुग्णांची संख्या आणि प्रतीक्षा यादी लक्षात घेता सेवाभावी संस्थांनी पुढे येवून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सहकार्य करावं. बदलती जीवनशैली तसंच वातावरणातील बदलामुळे आजारांचं प्रमाण वाढतंय. कर्करोगाच्या रुग्णांच्या निदानासाठी अत्याधुनिक सुविधांची आवश्यकता आहे. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टीक सेंटरमुळं या कामास प्रोत्साहन मिळेल, असं मुख्यमत्र्यांनी सांगितलं. तसंच राजकारणाला समाजकारणाची जोड असणं आवश्यक आहे. फडणवीस कुटुंबानं सर्वसामान्य जनतेचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी सातत्यानं काम केलंय. सेवाभावी संस्थांनी उच्च दर्जाच्या तसंच सर्व सामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

प्रतिकूल परिस्थितीत समाजसेवेला प्राधान्य : राजकारणासोबत शिक्षण, आरोग्य, विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, प्राण वाचवणाऱ्या आरोग्य सेवा गरिबांपर्यंत पोचवण्यासाठी गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टीक सेंटर महत्वाची भूमिका बजावेल. विदर्भातील जनतेपर्यंत या सेंटरच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा पोहचणार आहे. गंगाधर फडणवीस यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजसेवेला प्राधान्य दिल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

संस्थांच्या मागे समाजानंही उभं राहण्याची आवश्यकता : अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांसोबत बदलत्या काळानुसार शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे महत्वाचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. सामान्य जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन तत्पर आहे. त्यासोबतच खासगी व सेवाभावी संस्थांनीही पुढं येण्याची आवश्यकता असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. सर्वसामान्यांना आरोग्यावर खर्च करावा लागतो. हा खर्च टाळणं शक्य आहे. अशा संस्थांच्या मागे समाजानंही उभं राहण्याची आवश्यकता आहे. गरीब रुग्णांना नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.


हेही वाचा :

  1. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणारे वैद्यकीय उपचार आवश्यक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  2. अजित पवारांकडून लोकसभा मतदारसंघांची घोषणा; मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details