नागपूर :शहरपोलिसांनी एकूण आठ मुद्दे न्यायालयासमोर मांडले आहेत. त्यामध्ये पाशाने बांगलादेशात जाण्यापूर्वी अनेकांशी संपर्क केला होता. नंतर बांगलादेशमध्ये इस्लामिक जिहाद संदर्भात त्याने ट्रेनिंग घेतले होते. याशिवाय दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी त्याचे संबंध आहेत हे देखील चौकशीत उघड झाल्याचा मुद्दा पोलिसांनी न्यायालयाच्या समोर मांडला आहे. पाच लाख रुपये अफसर पाशाच्या खात्यात आले. कारागृहात मोबाईल कुठून आले या संदर्भातील चौकशी करण्यासाठी म्हणून पोलिसांनी आरोपीची पाच दिवस पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने दहशतवादी अफसर पाशाच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला आहे.
एनआयएच्या अर्जावर हायकोर्टात सुनावणी :मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी व खंडणी प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी मिळाली. याकरता राष्ट्रीय तपास संस्थाकडून गेल्या आठवड्यात नागपूरच्या विशेष कोर्टात एक अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. एनआयएला दोन्ही खटले नागपूर येथून मुंबईला हस्तांतरित करायचे असतील तर उच्च न्यायालयात जावे, असे आदेश नागपूरच्या विशेष कोर्टाने एनआयएला दिले होते. धंतोली ठाण्यात नोंदवलेल्या दोन्ही गुन्ह्यांबाबत नागपूर न्यायालयाचे स्थानिक अधिकार आहेत असे देखील निरीक्षण विशेष न्यायालयाने त्यावेळी नोंदवले होते. त्यानुसार एनआयएने आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज सादर केला आहे. त्यावर येत्या एक किंवा दोन दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे.