महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नक्षलवाद्यांच्या भ्याड टीसीओसीला उत्तर देण्यास महाराष्ट्र पोलीस समर्थ'

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये २२ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. यावेळी सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. असा हल्ला महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न झाल्यास तो मोडून काढण्यास महाराष्ट्र पोलीस दल समर्थ असल्याचे गडचिरोलीचे उप पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

By

Published : Apr 6, 2021, 12:17 PM IST

Gadchiroli DIG Sandeep Patil on Naxal attack
गडचिरोली डीआयजी संदीप पाटील टीसीओसी माहिती

नागपूर - छत्तीसगढ येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राच्या सीमाभागात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. मार्च ते मे महिन्यां दरम्यान नक्षलवाद्यांकडून टीसीओसी(टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव कॅम्पेन) ही मोहीम राबवली जाते. यामुळे सुरक्षा दले याकाळात अलर्टवर असतात. पोलीस ग्रुपला टार्गेटकरून नक्षली हल्ला करत असतात. यातूनच छत्तीसगढमध्ये हल्ला झाला आहे. जास्तीत जास्त नुकसानकरून शस्त्रे लुटून नेण्याची प्रमुख योजना या नक्षलवाद्यांची असते, अशी माहिती गडचिरोलीचे उप पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. हे टीसीओसी काय असते याबाबत अधिक माहिती देणारी ईटीव्ही भारतची ही विशेष बातमी...

टीसीओसीबाबत माहिती देताना गडचिरोलीचे उप पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील

छत्तीसगढमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया सीमांवरील सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सुरक्षा दले पूर्णपणे तयारीत असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. जवळपास सात पोस्ट या सीमेवरील अतिसंवेदनशील भागात तैनात आहेत. गुप्त माहितीच्या आधारे प्रत्येक लहान-मोठ्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. वेळ पडल्यास नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांनाना तोंड देण्यास आम्ही समर्थ असल्याचेही संदीप पाटील म्हणाले.

टीसीओसी मोहिमेतून होतात सर्वाधिक मोठे हल्ले -

नक्षलवाद्यांकडून मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत 'टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव कॅम्पेन' म्हणजेच टीसीओसी मोहिम राबवली जाते. या कालावधीत पोलिसांवर सर्वाधिक हल्ले होतात. जास्त जीवितहानीकरून शस्त्रसाठा लुटून नेण्याचा बेत आखून हे हल्ले केले जातात. यासाठी ते छोट्या-छोट्या पोलीस पोस्ट किंवा तुकड्यांवर घनदाट जंगलात पूर्ण ताकदीनिशी हल्ले करून जीवितहानी करण्याचा प्रयत्न करतात.

या काळात जंगलात हालचालींना येतो वेग -

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा घनदाट जंगलांचा प्रदेश, छत्तीसगढ, झारखंडमधील सीमाभागात नक्षलवाद मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात जंगलात पानगळीचा मोसम सुरू असतो. याच काळात नद्यांमधील पाणी आटून जाते. त्यामुळे नक्षलवाद्यांना हालचाली करण्यास सोपे जाते. दूरवर नजर ठेवून कारवाया यशस्वी करण्यासाठी नियोजन करता येते. विशेष म्हणजे आपले हल्ले यशस्वी करण्यासाठी ड्रोन सारख्या अद्ययावत वस्तूंचाही उपयोग करत असल्याची माहिती पुढे येत आहे. याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलीस देखील नक्षलवादी विरोधी मोहीम राबवत असतात.

टीसीओसी कालावाढीत होते मोठी जीवितहानी -

टीसीओसी काळात नक्षलवादी जास्त सक्रिय होतात. आतापर्यंतचे मोठे हल्ले याच काळात झाल्याचे दिसते. 6 एप्रिल 2010ला दंतेवाडा जिल्ह्यात चिंतलार भागात नक्षल्यांनी हल्ला केला होता. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 76 जवान शहीद झाले होते. 25 मे 2013ला छत्तीसगडमधील सुकमा जवळ झालेल्या नक्षली हल्ल्यात 25 जणांची हत्या झाली होती. गडचिरोलीमधील मरकेगाव, हत्तीगोटा, मुरमुरीमधील घटना टीसीओसी दरम्यानच घडलेल्या आहेत. 1 मे 2019 रोजी गडचिरोलीच्या जांभुळखेडामधील भूसुरुंग स्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते. ती घटना सुद्धा याच टीसीओसी कालावधीत घडली होती.

सी-60 ठरते कर्दनकाळ -

वाढत्या नक्षली कारवायांचा बिमोड करण्यासाठी सी-60 पथकाची मोठी मदत होत आहे. 1992 मध्ये विशेष कृती दल स्थापनकरून आदिवासी मुलांची भरती या सी-60 पथकात करण्यात आली होती. या पथकातील आदिवासी मुलांना स्थानिक भाषा अवगत असते. भौगोलिक परिस्थिती आणि आसपासच्या परिसराची सर्व माहिती या पथकाला असते. त्यामुळे नक्षलवाद्यांसाठी सी-60 ही बटालियन कर्दनकाळ ठरत आहे.

मागील दोन महिन्यात नक्षलविरोधी मोठ्या कारवाया -

गडचिरोलीच्या उत्तर-दक्षिण भागात गुप्त महितीच्या आधारे एक मोहीम सी-60 पथकाकडून राबवण्यात आली होती. यात नॉर्थ डिव्हिजनचा नक्षली भास्कर ईचामीसह अन्य चार जणांचा खात्मा झाला होता. खोब्रामेंढा आणि हेटाकेसा परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. भास्करवर 25 लाखांचे बक्षीस होते. यापूर्वी सुद्धा छत्तीसगढ सीमेवर असलेल्या कोपरशी भागात नक्षल्यांचा एक कारखाना उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले होते.

नक्षली एकत्र येऊ नये यासाठी करडी नजर -

टीसीओसीच्या काळात मोठ्या प्रमाणात नक्षली एकत्र येतात. एकाच ठिकाणी 200 ते 300 नक्षलवादी सहज आढळतात. एकत्र येऊन ते पूर्ण ताकदीनिशी हल्ले चढवत असतात. यामुळे त्यांना एकत्र येण्यापासून रोखण्यावर पोलिसांचा भर असतो. गुप्त माहितीच्या आधारावर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. अचूक माहिती मिळाल्यास गडचिरोली पोलीस विशेष मोहीम राबवून कारवाया करतात. नक्षल्यांनी हल्ला केल्यास तो मोडून काढण्यास महाराष्ट्र पोलीस दल समर्थ असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -असा हल्ला केल्याने ४०० नक्षलवादी पडले १५०० जवानांवर भारी, २२ जवानांना वीरमरण

ABOUT THE AUTHOR

...view details