नागपूर G20 Summits :जी20 परिषदेसाठी भारतात आलेल्या जागतिक नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावरुन आता राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर बाबासाहेबांनी देशाला घटना दिली आहे, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं, मात्र देशासाठी भाजपाचं काय योगदान आहे, असा सवाल केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या खोचक टीकेनं आता वादाला नवं तोंड फुटलं आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार :जी20 च्या नेत्यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे. 'बाबा' आणि 'बापू' यांनी हिंदुस्तानसाठी मोठं योगदान दिलं असल्याचं विजय वडेटटीवार यांनी स्पष्ट केलं. 'बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली आणि बापू अर्थात महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे या दोघांना वगळून हिंदुस्तानचा इतिहास लिहिता येत नाही. देशाच्या इतिहासात भाजपाचं काहीच योगदान नाही. कोणाच्या समाधीवर जावं, असा प्रश्न आहे. भाजपाकडं असा कोणताच इतिहास नाही, ज्यांच्या समाधीवर जावं, त्यामुळे सगळ्या दुनियाला माहिती असलेल्या महात्मा गांधींच्या समाधीवर जी20 परिषदेचे नेते गेले. या देशात पंडित नेहरुंनी योगदान दिलं, सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे नेते होते, सरदार वल्लभभाई पटेल हे देखील काँग्रेसचे नेते होते. त्यामुळे भाजपाकडं असा कोणताही नेता नाही', असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.