नागपूर - वन्यजीव प्रेमींसाठी आजचा दिवस आनंद देणारा आहे. अवनी वाघिणीच्या बछड्याला पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात आले आहे. आईपासून वेगळे झालेल्या या बछड्याला मागील दोन वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर या शावकाला २२ डिसेंबर २०१८ रोजी पेंचमधील तितरालमांगी येथील सुमारे पाच हेक्टर बंदिस्त क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी आणले गेले.
पीटीआरएप-८४ या नावाने ओळखली जाणार वाघिण -
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार तिला प्रशिक्षण देण्यात येत होते. या समितीच्या शिफारशीनंतर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर तिला रेडिओ कॉलर करण्यात आले होते. राज्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे तिच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. शुक्रवारी या वाघिणीच्या अधिवासाचा दरवाजा उघडण्यात आला आणि तिला पेंचच्या जंगलात मुक्त करण्यात आले. तीन वर्षे आणि दोन महिने वय असलेली ही वाघिण पीटीआरएप-८४ या नावाने ओळखली जाणार आहे.