नागपूर -राज्यातील अनेक जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. मात्र, वाहन घेताना ग्राहकांना विक्रेत्यांनीच दोन हेल्मेट मोफत द्यावे, असा कायदा आहे. परंतु या कायद्याचे सहसा पालन होताना दिसत नाही.
दुचाकी ग्राहकांना वाहन खरेदीवेळी 'हेल्मेट' न देणाऱ्या कंपनीसह विक्रेत्यांकडून ग्राहकांची होतेय फसवणूक नागपूरचे सौरभ भारद्वाज व मनीष सिंग चौहान यांच्या लक्षात ही बाब आली. या दोघांनीही याबाबत वैयक्तीक पातळीवर चौकशी केली. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे याची माहिती तपासली. तेव्हा 2006 मध्येच हा कायदा अस्तित्वात आल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये सौरभ भारद्वाज व मनीष सिंग चौहान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.
हेही वाचा...'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण खोटी ठरवावी'
कायदा असूनही त्याचे पालन करण्यात येत नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. न्यायालयात हे प्रकरण गेल्यावर न्यायालयाने शहरातील 17 दुचाकी विक्रेत्यांना नोटीस बजावली होती. तसेच दुचाकी ग्राहकांना दुचाकी खरेदी केल्यावर दोन हेल्मेट का देण्यात येत नाही, अशी विचारणा केली. त्यावर विक्रेत्यांनी संयुक्त प्रतिज्ञापत्र सादर करत उत्पादक कंपन्याच विक्रेत्यांना हेल्मेट पुरवत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वाहन उत्पादक कंपन्यांना नियमाचे पालन करण्यास सांगावे, असे निर्देश महाराष्ट्र परिवहन आयुक्तांना निर्देश दिले. तसेच ज्या कंपन्या नियमांचे पालन करणार नाही, त्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या वाहनांची नोंदणी करण्यात येऊ नये, असेही आदेश दिले. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार उत्पादकांनी ग्राहकांना दुचाकी खरेदी केल्यावर 2 हेल्मेट देणे बंधनकारक आहे. परंतु या नियमाचे पालन करण्यात येत नाही.
रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दरवर्षी हजारोंच्या घरात आहेत. त्यातही हेल्मेट न घातल्यांने होणाऱ्या अपघातात मृत्यूची संख्या मोठी आहे. 2016 ते मार्च 2018 पर्यंत विविध अपघातात साडेनऊ हजार विना हेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. हेल्मेट घालून वाहन चालवावे, असा नियम आहे. त्याचप्रमाणे दुचाकी खरेदी करताना ग्राहकांना हेल्मेट मोफत देण्यात यावे, असा कायदा आहे. परंतु हा कायदा काही पाळला जात नाही. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास, अपघाती मृत्यूच्या घटनांवर आळा बसवण्यात नक्की यश येईल.
हेही वाचा...तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे