नागपूर -नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेल्या वाकी येथील कन्हान नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चारही मृत हे नागपूर शहरातील रहिवासी आहेत. नागपूर येथील आठ तरुण वाकी नदीच्या परिसरात फिरायला गेले होते. यापैकी चार युवकांचा कन्हान नदीच्या पात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू केला असता केवळ एकाचा मृतदेह मिळाला.
वाकी येथील कन्हान नदीत चार तरुण बुडाले; एकाच मृतदेह शोधण्यात यश
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेल्या वाकी येथील कन्हान नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चारही मृत हे नागपूर शहरातील रहिवासी आहेत. नागपूर येथील आठ तरुण वाकी नदीच्या परिसरात फिरायला गेले होते. यापैकी चार युवकांचा कन्हान नदीच्या पात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी असलेले आठ युवक पिकनिकसाठी सावनेर तालुक्यातील वाकी येथे आले होते. मात्र, येथे पोहोचल्यानंतर त्यांना वॉटर पार्क बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी परिसरात असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचा बेत आखला. आठही तरुण गाडीने कन्हान नदी पात्राजवळ गेले. त्यावेळी त्यापैकी चार तरुणांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, या युवकांना पाणी किती खोल आहे याचा अंदाज आला नाही. पाण्यात उतरताच ते चारही तरुण बुडू लागले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही.
पोलीस घटनास्थळी दाखल, शोध सुरू -
घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. गोताखोरांना फक्त एका युवकाचा मृतदेह आढळून आला. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. परिसरात पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात मोठी अडचण येत आहे.
पर्यटक फलकाकडे दुर्लक्ष करतात -
वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोल डोह आहे. या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. याची माहिती देणारे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. मात्र, येथे येणाऱ्या युवकांना पोहण्याचा मोह आवरत नसल्याने फलकाकडे दुर्लक्ष करतात.