नागपूर:नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्याच्या वाकी येथील नदीत एका तरुणीसह चार मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. सोनिया मरसकोल्हे, विजय ठाकरे, अंकुश बघेल, अर्पीत पहाले अशी चारही मृतकांची नावे आहेत. तीन तरुण आणि तीन तरुणी गुरुवारी दुपारी वाकी परिसरात फिरायला गेले होते. यावेळी चौघेही कन्हान नदीत उतरले. यावेळी चौघांना नदी पात्रात पोहण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी केलेले धाडस त्यांच्या जीवावर बेतले आहे.
अंधार पडल्यामुळे शोध कार्यात अडचणी: या संदर्भात माहिती समजताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कुणाचाही मृतदेह सापडलेला नाही. अंधार पडल्यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत. सहा तरुण-तरुणींचा ग्रुप आज वाकीला आले होते. सुरुवातीला नदीच्या काठावर काही वेळ घालवल्यानंतर सर्वांना कन्हान नदीत पोहण्याचा मोह झाला. सर्व सहा जण नदीत उतरल्यानंतर सोनिया मरसकोल्हे, विजय ठाकरे, अंकुश बघेल आणि अर्पीत पहाले हे चौघे पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते खोल पाण्यात गेले असता चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू:उर्वरित दोघांनी बुडणाऱ्या मित्र-मैत्रिणींना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र, त्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणीचा जीव वाचवता आला नाही. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांची मदतही घेतली जात आहे.