नागपूर - एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलीने जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये तिच्या प्रियकरासह त्याच्या तीन मित्रांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; चौघांना अटक - नागपूर सामूहिक लैंगिक अत्याचार आरोपी
राज्याच्या उपराजधानीमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
अत्याचाराची ही घटना २५ ऑगस्टला घडली होती. पीडित मुलगी तिचा प्रियकर यश मेश्राम याच्यासोबत नागपूरजवळच्या नारागाव परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी यशचे अभिनेश देशभ्रातार, अमित बोलके आणि ऋतिक मोहरले हे तीन मित्र तिथे आले. त्यांनी पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर यश मेश्रामने पीडितेला घराजवळ तिच्या घरी सोडले. बदनामी आणि जीवाला धोका ओळखून पीडितेने या प्रकाराची वाच्यता केली नाही.
मात्र, यशचा मित्र अभिनेश याने घडलेल्या प्रसंगाबद्दल मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. सततच्या धमक्यांना कंटाळून पीडित मुलीने या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने तिने काल रात्री जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी चारही आरोपींना सामूहिक लैंगिक अत्याच्याराच्या गुन्ह्याखाली अटक केली.