नागपूर- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पाठिशी नाहीत. त्यामुळे अधिकारीही त्यांचे ऐकत नाहीत, म्हणून हे सगळे घडत आहे. अशातच राऊत यांनी वीज बिलामध्ये तडजोड होणार नाही, असे सांगितले. यावरून आज भाजप नेते माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. आज नागपुरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय ऊर्जामंत्र्यांनी लोकांना दिलासा न दिल्याने लोक चिडले आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
राज्यात वाढीव वीज बिलांमध्ये कोणताही दिलासा मिळणार नाही, असे खुद्द ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांकडून यावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या विषयावर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली. मार्च-एप्रिल महिन्यातील अँव्हरेज बील वीज कंपन्यांकडून पाठविले जात आहे. या महिन्यात सर्व बंद असताना इतके वीज बील सरसकट कसे पाठवू शकता? त्यामुळेच जनता नाराज होत रोष व्यक्त करत आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.