नागपूर : माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. आशिष देशमुख यांची भाजपमध्ये घरवापसी झाली असल्याची भावना यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत केले.
विदर्भाच्या हितासाठी काम करणार :आशिष देशमुख यांनी भाजपा प्रवेशाआधी शनिवारी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मी कुठल्याही पदाची मागणी केलेली नाही, मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेल, पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारत राहणार. माझी पुढील राजकीय वाटचाल श्रद्धा आणि सबुरीनेच राहील. मी विदर्भाच्या हितासाठी काम करणार असे त्यांनी म्हटले होते.
काँग्रेस पक्षातून निलंबित :काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावत आशिष देशमुख यांना २२ मे रोजी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले होते. याबाबत आशिष देशमुख यांनी राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, असे आवाहन केले.
सतत निवडणूक पराभव :आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. पटोले यांच्यामुळेच महाराष्ट्रात काँग्रेसला सतत निवडणूक पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. आशिष देशमुख यांनी २०१९ मध्ये भाजप सोडला होता. त्यानंतर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
हेही वाचा :
- Ashish Deshmukh Suspends : माजी आमदार आशिष देशमुखांवर अखेर कारवाई ; पक्षातून केले निलंबित
- Ashish Deshmukh Rejoin BJP : माझी पुढील राजकीय वाटचाल श्रध्दा, सबुरीच्या मार्गावर असेल - आशिष देशमुख
- Deshmukh Met Bawankule : काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुखांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट