नागपूर -यवतमाळमधील तो डॉक्टर रुग्णाच्या वडिलांशी नीट बोलत नव्हता. तसेच त्याच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. लोकप्रतिनिधींनीही तक्रारी केल्या होत्या. हे सर्व पाहून तेथील अधिष्ठात्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरला ८ दिवसासाठी शिक्षा देण्यात आली आहे. मात्र, ही शिक्षा मी नव्हे तर, तेथील अधिष्ठात्यांनी दिली असल्याचे स्पष्टीकरण वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे.
'तो' डॉक्टर वडिलांच्या रुग्णाशी नीट बोलत नसल्याने शिक्षा दिली - वनमंत्री संजय राठोड हे प्रकरण झाले तेव्हा मी यवतमाळमध्ये उपस्थित नव्हतो. मात्र, आता यवतमाळला जाणार आहे. त्या डॉक्टरसोबत बोलणार आहे. सर्वांशी बोलून ज्यांची चूक असेल त्यांच्यावर पुढील कारवाई होईल, असेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण? -
वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. अच्युत नरोटे या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. त्यावेळी एका विष बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. विषबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राठोड यांना फोन लावला. उपचारात व्यग्र असलेल्या डॉक्टरांना ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र, ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो किंवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये,’ असे उत्तर डॉ. अच्युत नरोटे यांनी दिले होते.
रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील हे संभाषण फोनवर असलेल्या संजय राठोड यांनी ऐकले. यानंतर डॉ. अच्युत नरोटे यांना दुसऱ्या दिवशी आठ दिवस निलंबन करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. कुठलाही दोष नसताना केवळ मंत्र्याचा फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का? असा प्रश्न त्यांनी आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला होता. लोकप्रतिनिधींचा अवमान केला म्हणून आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी डॉ. नरोटेंवर कारवाई करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.