नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, आता हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. पेंच व तोतलाडोह प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून त्यामुळे कन्हान, उमरेड, कामठीतील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे.
नागपुरातील पूर ओसरू लागला; परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांना दिलासा
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. अनेक तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहे. मात्र, आता हळूहळू पुराची पाणी पातळी कमी होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. अनेक तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहे. मात्र, आता हळूहळू पुराची पाणी पातळी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील कन्हान, सांड, सूर या नद्यांना पूर आला होता. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिक या पूरात अडकले होते. प्रशासनाच्या वतीने जवळपास ३६ गावातील १४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. तर, अनेक लोकांना हेलिकॉप्टरच्या साह्यानेदेखील बाहेर काढण्यात आले.
आता स्थिती बदलत असून पुराचे पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे परिसरातील कन्हान, मौदा, कुही या तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सध्या पावसानेही विश्रांती घेतल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय तोतलाडोह व पेंच प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पुराचे पाणी कमी होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.