महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्याने विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग, प्रवाशाचा रुग्णालयात मृत्यू - नागपूर विमानतळावर विमानाची आपत्कालीन लॅंडिंग

मुंबईवरून रांचीला जात असलेल्या विमानातील एक प्रवाशाची तब्येत अचानक खालावल्याने विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 21, 2023, 11:02 PM IST

Updated : Aug 22, 2023, 10:34 AM IST

नागपूर : नागपूर विमानतळावर विमानाची आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आली. ही लँडिंग सोमवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मुंबईवरून रांचीला जात असलेल्या विमानातील एक प्रवाशाची तब्येत अचानक खालावल्याने विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मात्र, प्रवाशाचा रुग्णालयात मृत्यू झाला. देवानंद तिवारी असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

देवानंद तिवारी हे सीकेडी आणि क्षयरोगाने आजारी होते. विमान ( विमान क्रमांक 6E 5093) मुंबईहून रांचीला जात असताना या प्रवाशाची विमानात मोठ्या प्रमाणात रक्ताची उलटी झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली. आजारी असलेल्या प्रवाशाची गंभीर स्थिती पाहून वैमानिकाने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान रक्ताच्या उलटी झाल्यानं विमानाला नागपूर उतरविण्यात आले. प्रवाशाला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देवानंद तिवारी यांचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

17 ऑगस्टला नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू-नागपूर विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात 17 ऑगस्टला वैमानिकाचा मृत्यू झाला. वैमानिक नागपूरहून पुण्याला विमान घेऊन जाण्यासाठी तयारी करत होता. अचानक विमानात चढण्यापूर्वीच बोर्डिंग गेटजवळ वैमानिक बेशुद्ध पडले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफने धावाधाव करत वैमानिक कॅप्टन मनोज सुब्रमण्यम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वैमानिकावरील तणाव आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या हा विषय यानिमित्ताने चर्चेत आला.

रविवारी जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग -लखनौहून शारजाहून जाणाऱ्या इंडिगो विमानाचे रविवारी जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. इंडिगोचे फ्लाइट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करणार असताना एका प्रवाशाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. परिस्थिती पाहून वैमानिकानं यू-टर्न घेत जयपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे (ATC) आपत्कालीन लँडगची परवानगी मागितली. एटीसीने परवानगी दिल्यानंतर विमान जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. ह्रदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उर्वरित प्रवाशांना घेऊन विमानाने शारजाहच्या दिशेनं उड्डाण केले.

इंडिगोकडून दु:ख व्यक्त-इंडिगो कंपनीने प्रवाशाच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं. इंडिगोने म्हटले, मुंबई ते रांचीला जाणारे इंडिगो फ्लाइट वैद्यकीय आणीबाणीमुळे नागपूरला वळविण्यात आले. प्रवाशाला खाली उतरवण्यात आले. प्रवाशाला पुढील वैद्यकीय मदतीसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने, प्रवासी वाचू शकला नाही. आमचे विचार, प्रार्थना त्याच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत आहेत.

Last Updated : Aug 22, 2023, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details