नागपूर - भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य गिरीश व्यास यांच्या विकासनिधीतून पाच रुग्णवाहिका नागपूर ग्रामीणला देण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रुग्णवाहिका हस्तांतरित करण्यात आल्या. यावेळी नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील आजी-माजी आमदार उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या या कठीण काळात नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमकुवत झाल्याचे वारंवार समोर आलेले आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर रुग्णांना बेड मिळणे देखील कठीण झाले होते. अशा परिस्थितीत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यासारख्या उपकरणांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. तर, ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी देखील रुग्णवाहिका मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे विधानपरिषद आमदार गिरीश व्यास यांच्या आमदार निधीतून पाच रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले आहे. देवालापार, कुही आणि उमरेड तालुक्यातील रुग्णालयांना या रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. तसेच ५० लाखांच्या आमदार निधीतून इतर साहित्य विकत घेतले जात असल्याची माहितीही आमदार गिरीश व्यास यांनी यावेळी दिली आहे.