नागपूर - कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी निश्चित औषध किंवा लस अद्यापही विकसीत झालेली नाही. सध्या राज्यात प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहे. नागपुरात देखील कोरोनाला पराभूत करून बऱ्या झालेल्या रुग्णाने इतर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने प्लाझ्मा दिला आहे.
संतोष तोतवानी असे प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते नागपुरातील पहिले प्लाझ्मा डोनर ठरले आहेत. सोबतच कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयसीएमआरने देशातील केवळ 21 वैद्यकीय महाविद्यालयांना 'प्लाझ्मा थेरपी'साठी परवानगी दिली आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा देखील समावेश आहे.
नागपुरात कोरोना विषाणूने हात-पाय पसरायला जेमतेम सुरुवात केली होती. त्या काळात संतोष तोतवानी यांना कोरोनाची लागण झाली. १४ दिवस योग्य उपचार झाल्यानंतर ते ठणठणीत होऊन घरी परतले होते. गृह विलगीकरण संपल्यानंतर ते सामान्य आयुष्य जगत असताना त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून प्लाझ्मा डोनेट करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी लगेचच होकार कळवळा. त्यानुसार त्यांनी प्लाझ्मा डोनेट देखील केला आहे.
कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी यशस्वीपण लढणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. या अँटीबॉडीज कोरोनाग्रस्ताच्या शरीरात सोडल्यास त्याच्या शरीरात कोरोनाशी लढण्याची क्षमता निर्माण होते. म्हणूनच कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो. संतोष तोतवानी यांच्या प्लाझ्माची योग्य तपासणी करून त्यांच्या गुणधर्माशी समरूप रुग्णाला प्लाझ्मा दिला जाणार आहे.