नागपूर/मुंबई - राज्यात पाच स्तरांमध्ये 'अनलॉक' करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, त्यानंतर काहीच वेळात राज्याच्या जनसंपर्क व माहिती कार्यालयाने अनलॉकबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यामुळे राज्य सरकारमध्येच समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. याबाबत राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता राज्यात पाच स्तरांमध्ये 'अनलॉक' करण्यात येणार असल्याच्या निर्णयाला तत्वता मान्यता देण्यात आली असून 'अनलॉक' संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नागरिकामध्ये गैरसमज झाला असल्याचे सांगत वडेट्टीवारांनी नागपूर विमानतळावर बोलताना आपले शब्द फिरवले आहेत.
वडेट्टीवारांनी शब्द फिरवले; म्हणाले तत्वतः मान्यता दिली...
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठक आज पार पडली यावेळी 12 वीच्या परिक्षेसह राज्यातील लॉकडाऊन संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ही बैठक झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात पाच स्तरांमध्ये हे 'अनलॉक' करण्यात येणार असून ज्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती. तसेच मुंबईत बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असून शहरातील रेस्टोरंट सुरू होतील, २०० लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभाला परवानगी,चित्रपटाचे शुटिंग, सिनेमागृह यावरचे निर्बंध हटवले असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले होते. यामुळे जनतेचा गोंझळ उडाल्याने राज्य सरकारकडून लॉकडाऊन अद्याप उठला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर कोणतेही निर्बंध हटवले नसून याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत, अनलॉकसाठी तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे स्पष्टीकरण देत वडेट्टीवार यांनी नागपुरात मुंबईतील पत्रकार परिषदेतील आपले शब्द फिरवले आहेत.