नागपूर :परिवहन अधिकारी रवींद्र भुयार गेल्या वर्षभरापासून त्रास देत आहेत. मनात लज्जा निर्माण होईल, अशापद्धतीने अश्लील भाषेत बोलत अपमानित करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. यावर परिवहन विभागात अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. अधिकाऱ्याची एका समितीसमोर सुनावणी होणार आहे. शुक्रवारी ही समिती नागपूर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आरटीओ रविंद्र भुयारकडून होणारा त्रास फार वाढत असल्याने महिला अधिकाऱ्याने थेट मोटर वाहन आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
काय आहे तक्रारीत :तक्रारीत अनेक आरोप केले आहेत, ज्यामध्ये रवींद्र भुयार कोणतेही काम नसताना रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवत होते. तिच्यावर सतत आक्षेपार्ह टिप्पणी करीत होते. तिला बाहेर फिरण्यासाठी सोबत चलण्याची मागणीही करायचे. एवढेच नाही तर नेहमीच वाईट हेतूने वागत असून स्वत:च्या चेंबरमध्ये बोलावून अश्लील विनोद करीत होते. गरज नसताना ते माझ्या घरी येऊन बसायचे. रात्री उशिरापर्यंत जात नसत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावर परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी समिती येणार :महिला अधिकाऱ्याने मोटर वाहन आयुक्तांकडे तक्रार नोंदवल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मोटर वाहन आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. कार्यालयात महिलांचा छळ रोखण्यासाठी गठीत समिती समोर सुनावणी होणार आहे. महिला तक्रार निवारण समिती शुक्रवारी नागपूरला येणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत कळताच रवींद्र भुयार यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच बदली रद्द करून त्यांची नव्याने नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने रविंद्र भुयार चर्चेत आले होते.
महिलेच्या भावाने दिली समज :तक्रारदार महिला अधिकाऱ्याने या संदर्भात तिच्या मोठ्या भावाला माहिती दिली होती. त्यानंतर महिला अधिकाऱ्याच्या भावाने नागपूर गाठून रवींद्र भुयार याला समज दिली होती. त्यावेळी रवींद्र भुयार यांनी यापुढे असे कृत्य पुन्हा करणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, तरीदेखील रवींद्र भुयार यांच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यामुळे अखेर महिलेने परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात खळबळ माजली आहे. यासंदर्भात रविंद्र भुयार यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा : Minor Girl Rape Case Nagpur: लिव्ह-इन पार्टनरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक