नागपूर -चार दिवसांपूर्वी नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिलपी तलावात वडील आणि मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शेख कुटुंबीय मोहगाव झिलपी येथे गेले होते, त्याच मुलाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे.
१७ एप्रिल रोजी ३५ वर्षीय अब्दुल असिफ शेख आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा शहबील अब्दुल असिफ या दोघांचा तलावात बुडल्याने मृत्यू झाला होता. महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी अब्दुल असिफ शेख यांच्या लहान मुलाचा वाढदिवस होता, वाढदिवस साजरा करण्यासाठी शेख कुटुंबीय मोहगाव झिलपी तलाव परिसरात गेले होते. त्याचदरम्यान अब्दुल शेख यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. अब्दुल शेख हे पोहत असताना अचानक बुडायला लागले, ही घटना त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच, पत्नीने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. त्यांच्या पत्नीच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा शहबील अब्दुल असिफ हा देखील वडिलांना वाचवण्यासाठी तलावात उतरला. मात्र या घटनेमध्ये बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या पत्नीला वाचवण्यात यश आलं आहे.