नागपूर -केंद्र सरकारने नव्या कृषी कायद्यांची निर्मिती केली आहे. मात्र हे कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत विविध शेतकरी संघटनांनी ते रद्द करण्याची मागणी केली आहे. या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला तब्बल सहा महिने उलटल्यानंतर देखील, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. याचा निषेध करण्यासाठी आज देशभरात विविध शेतकरी संघटनांकडून काळा दिवस पाळण्यात आला आहे. नगपूरमध्ये देखील संयुक्त किसान मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान संघटना यांच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. आज नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत, हे विशेष.
शेतकरी संघटनांकडून केंद्र सरकारचा निषेध काळे झेंडे दाखवत पंतप्रधानांचा निषेध
२६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर होताच नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली. यानंतर सरकार आणि आंदोलकांमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र तोडगा निघू शकला नाही. आज या आंदोलनाला सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना केंद्र सरकारने आता आंदोलनाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेकडून करण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत मोदींचा निषेध केला.
हेही वाचा -धक्कादायक! लखनऊ पाठोपाठ मुंबईतील सांडपाण्यातही आढळला कोरोना विषाणू