नरखेड (नागपूर) : तालुक्यातील अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी तसेच वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अरविंद बनसोड या तरुणानाने आत्महत्या केली नसून, त्याचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
32 वर्षीय अरविंद बनसोड हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता, पदवीचे शिक्षण घेतलेला अरविंद त्याच्या पिंपळदरा गावासोबतच आजूबाजूच्या गावातही सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध होता. 27 मे रोजी नरखेड तालुक्यातील थडीपवनी या शेजारच्या गावात तो आला. या ठिकाणी असलेल्या घरघुती गॅस एजन्सीचा फोटो काढत असताना एजन्सी संचालक असलेल्या मयूर उमरकर याच्याशी अरविंदचा वाद झाला. यावेळी अरविंद सोबत त्याचा एक मित्रही उपस्थित होता.
यावेळी मयूरने अरविंदला त्यावेळी मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मारहाण केल्यानंतर अरविंद तेथून निघून नजीकच्या बँकेत आला. त्या ठिकाणीही अरविंद बनसोडला मयूर उमरकर आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. या मारहाणी मुळे अपमानित झालेल्या अरविंदने कीटनाशक प्राशन केले. त्यानंतर तो गॅस एजन्सी समोर पडून होता. तेथून मयूर उमरकर यानेच अरविंदला स्थानिक आरोग्य केंद्रात व पुढे नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती समोर येत आहे.