नागपूर- स्वत:ला 'रॉ' एजंट सांगून नागपूर पोलिसांची झोप उडविणाऱ्या भामट्याचे पितळ उघडे पडले आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९) असे या तोतया रॉ एजंट चे नाव आहे. विदेशी चलने बाळगणाऱ्या इमरानच्या आमिषाला एक महिला आणि तिचे कुटुंबीयही बळी पडले आहे.
'रॉ' एजंट असल्याचे सांगून महिलेला ३० हजाराचा गंडा; नागपूर पोलिसांचीही उडवली झोप
रॉ एजंट सांगून नागपूर पोलिसांची झोप उडविणाऱ्या भामट्याचे पितळ उघडे पडले आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९) असे या तोतया रॉ एजंट चे नाव असून त्याने एका महिलेला ३० हजाराचा गंडा घातला आहे.
११ जूनला गिट्टीखदान पोलीस ठाण्यात एक तरुण आला होता. त्याने स्वत:ला रॉ एजंट सांगून एका महिलेसोबत लग्न करण्यासाठी पोलिसांची मदत मागितली होती. पण खासगी जीवनात हस्तक्षेप न करण्याच कारण सांगून पोलिसांनी तरुणाला परत पाठविले होते. मात्र, हा तोतया एवढ्यावरच न थांबता त्याने आर्थिक शाखेच्या डीसीपी आणि अतिरिक्त महासंचालकांना या बाबतीत फोन केला. अधिकाऱ्यांनी याविषयी गिट्टीखदान पोलिसांनाही फोन केले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पोलिसांनी लगेच इमरानला ठाण्यात आणले आणि त्याची चौकशी सुरू केली. इंग्रजीसोबतच इतर आठ भाषा बोलण्यात इमरान तरबेज असल्याचे पाहुन पोलीसही चक्रावून गेले होते.
इमरान नागपूरच्या एका ३५ वर्षीय घटस्फोटीत महिलेशी लग्न करणार होता. १५ दिवसांपासून तो महिलेच्या घरी वास्तव्यास होता. महिलेच्या घरच्यांना देखील त्याने रॉ एजंट असल्याचे सांगितले होते. यादरम्यान त्याने विविध कारणे सांगत महिलेकडून ३० हजार उकळले होते. महिलेला इमरानवर संशय आल्याने तिने त्याला रॉ चे ओळखपत्र मागितले. मात्र इमरान ने उडवाउडावीची उत्तरे दिल्याने महिलेने त्याला लग्नास नकार दिला होता. याबाबत त्यानी पोलिसांची मदत घेतली, मात्र पोलिसांनी इमरानचेच पितळ उघडकीस आणले.