नागपूर- शहरातील लोकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाचा खऱ्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिलीप टापरे असे अटकेत असलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो तोतया पोलीस बनून लोकांकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
तोतया पोलिसाला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शहरातील लोकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या तोतया पोलिसाचा खऱ्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिलीप टापरे असे अटकेत असलेल्या बोगस पोलिसाचे नाव आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून तो पोलिसाच्या वर्दीचा धाक दाखवून लोकांकडून आत्मविश्वासाने अवैद्यपणे पैसे उकळायचा. पोलिसांनी देखील दिलीपला खरा पोलीस समजून दुर्लक्ष केले होते. मात्र, नुकताच लकडगंज येथील गंगाजमूना परिसरात तो पैशासाठी हुज्जत घालताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी दिलीपला विचारणा केली, मात्र त्यादरम्यान दिलीपच्या वर्दीवर नेमप्लेट दिसली नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर लकडगंज पोलिसांनी तुरंत दिलीप टापरे याला बेड्या ठोकल्या.
दिलीप मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातला असून, नागपूरात गाडगेबाबानगर परिसरात राहतो. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, २६०० रुपये रोख आणि दुचाकी जप्त केली आहे. लकडगंज पोलीस स्टेशनचे एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना उघडकिस आल्यानंतर शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.