नागपूर :नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फारुख नगर येथून कालपासून बेपत्ता झालेल्या तीनही मुलांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून त्या भागात तणाव निर्माण झाला आहे. तौफिक फिरोज खान (४ वर्ष), आलिया फिरोज खान (६ वर्ष) आणि आफरीन इरशाद खान (६ वर्ष) हे तीन मुले कालपासून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी गेल्या २४ तासात या मुलांना शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, आज संध्याकाळी तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत.
तौफिक, आलिया आफरीन बेपत्ता :तीन मुले कालपासून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलिसांनी संपूर्ण परिसरात त्यांचा शोध घेतला. पोलिसांनी हजारो सीसीटीव्हीही तपासले मात्र, बेपत्ता मुलांचा कुठेही पत्ता नाही लागला. काल रात्रभरापासून शेकडो पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांचा शोध घेत होते. फारूक नगर परिसरात अनेक कारखाने आहेत. त्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, आज संध्याकाळी मुलांच्या घराजवळच्या एका भंगाराच्या गाडीत तिघांचे मृतदेह आढळली आहेत. पोलिसांनी तीनही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवले असून या मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.