नागपूर- भविष्यात पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र यावेत अशीच सर्वांची इच्छा आहे. युतीचे सरकार राज्यात येईल असे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असतील तर यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करून निर्णय घ्यावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावे, असे सर्वांना वाटत आहे. राजकीय समीकरण तसे संकेत देत आहेत. शिवसेनेतील असे अनेक नेते आणि आमदारांची महाविकास आघाडी सरकारमध्ये घुसमट होते आहे. त्यामुळेच अनेकांना शिवसेनेने भाजपसोबत जावे, असे अगदी मनापासून वाटू लागले आहे. म्हणून आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मंत्री रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहून फायदा नाही. त्यांनी भाजपसोबत यावे, असे मी अनेकदा म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाने एकत्रित येऊन सरकार स्थापन केल्यास राज्याच्या विकासाला चालना मिळेल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. गरज पडल्यास मी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवेसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील भेट घेईल, असे आठवलेंनी सांगितले.
हेही वाचा -भाजपमधील आमच्याकडे आलेले भविष्यात आमचे सहकारी होऊ शकतात - महसूलमंत्री थोरात