नागपूर - देशात सत्तेसाठी स्पर्धा राहणार आहे. पण त्यालाही एक मर्यादा असते. जेवढी आपसांत टीका करायची तेवढी करावी पण आपसात भेद होईल असे वागू नये, असा वडिलकीची सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. देशाची अखंडता कायम राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही, असा घणाघातही कुणाचेही नाव न घेता भागवत यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्ष वर्ग प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप झाला. या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, कोल्हापूरच्या सिद्धगिरी संस्थान मठ कनेरीचे काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांनी 25 दिवस प्रशिक्षण घेतलेल्या 682 स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
...तर देशाचे कल्याण होणार नाही -मधल्या काळात समाजामध्ये जात पात आली. बाहेरून आक्रमणे झाली. ते आले तसेच बाहेरचे निघूनही गेले. आता बाहेरचे कोणीही देशात नाहीत. जे आहेत ते आपलेच आहेत. त्यांचे प्रबोधन करणे आपले काम आहे, असे भागवत म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आम्ही साजरी केली. तसेच जी 20 ची अध्यक्षताही आम्हाला मिळाली. आता तर देशाला नवी संसद मिळाली आहे. जी जागृती पाहिजे होती त्याचे प्रयत्न होत आहेत. भारताची कीर्ती होत आहे. काही गोष्टी ठीक झाल्या. मात्र काही ठीक झाल्या नाही तर देशाचे कल्याण होणार नाही.
सत्ताधाऱ्यांना इशारा -देशातील सध्य परिस्थितीवरही भागवत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देशात सध्या अनेक कलह सुरू आहेत. भाषा, पंथ संप्रदाय, मिळणारे लाभ यावरुन समाजात विभाजन होताना दिसत आहे. स्वतःच आपली हिंसा आपण करु लागलो आहोत. आपण एकसंघ असल्याचे विसरू लागलो आहोत, याला हवा देणारेही लोकही आहेत, असा एकप्रकारे घरचा आहेरच भागवत यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नाव न घेता थेटपणे दिला आहे.