महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्लास्टिक 'स्ट्रॉ'वर पर्याय उपलब्ध, नागपूरच्या श्रेयसने गव्हाच्या धांड्यापासून बनविले स्ट्रॉ - नागपूर बातम्या

नागपुरातील श्रेयस नंदनवार या तरुण आर्किटेक्टने गव्हाच्या धांड्यापासून 'स्ट्रॉ' बनविले आहेत. जे पर्यावरणपूरक तर आहेतच शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देणारे आहेत.

नागपूर

By

Published : Jun 9, 2019, 5:40 PM IST

नागपूर - प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात येऊ लागल्यानंतर अनेक राज्यांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्लास्टिकवर पर्याय शोधण्याच्या संशोधनाला वेग आला आहे. प्लास्टिकमुक्त वस्तू बनविण्याचे काम दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरातील श्रेयस नंदनवार या तरुण आर्किटेक्टने गव्हाच्या धांड्यापासून 'स्ट्रॉ' बनविले आहेत. जे पर्यावरणपूरक तर आहेतच शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देणारे आहेत.

नागपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा जागर केल्यानंतर देशात स्वच्छतेच्या बाबतीत नवी क्रांती घडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी केलेली प्लास्टिक बंदी देखील प्रभावी ठरल्याने परिवर्तन घडताना दिसते आहे. पर्यावरणाप्रती वाढती जागरुकता लक्षात घेता, अनेक रेस्टॉरन्ट व ज्यूसच्या दुकानात आता कागदापासून बनलेल्या पर्यावरण पूरक स्ट्रॉचा उपयोग होत आहे. पण कागदाचा वाढता उपयोगसुद्धा पर्यावरणासाठी नुकसानदायक आहे. कागद बनविण्यासाठीसुद्धा झाडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. याकडे लक्ष वेधून श्रेयसने स्वत:ची कल्पकता लावून शेतीतून निघणाऱ्या वेस्टपासून बेस्ट बनविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी गहू काढल्यानंतर गव्हाचे धांडे जाळून टाकतात. या धांड्यावर प्रक्रिया करून श्रेयसने स्ट्रॉ तयार केले. त्याचा खर्च अतिशय कमी आहे. श्रेयसने बांबूपासूनही स्ट्रॉ बनविले आहेत. विशेष म्हणजे, श्रेयस हा अहमदाबाद येथे आर्किटेक्टची पदवी घेत असताना हा प्रोजेक्ट अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून केला.

श्रेयस स्टडी टूरसाठी सिंगापूरला गेला होता. तिथे एका रेस्टॉरन्टमध्ये त्याला कॉफीसोबत बांबूचे स्ट्रॉ दिले होते. त्यावेळी त्याच्या डोक्यात ही कल्पना आली. त्याने बांबूसोबतच गव्हाच्या धांड्यावर संशोधन केले. त्यातून या पर्यावरणपूरक स्ट्रॉची निर्मिती झाली आहे. श्रेयसच्या या प्रयोगाला चालना मिळाल्यास पर्यावरणाचा रक्षणासाठी एक पाऊल टाकले जाईल आणि शेतकऱ्यांना देखील उत्त्पनाचे एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details