नागपूर- सद्या आपण मानवनिर्मित समस्यांना तोंड देत आहोत. लोकसंख्या वाढ ही भीषण समस्या बनली असून याचा निसर्गातील साधनसंपत्तीवर ताण पडत आहे. यामुळे प्रदूषणाची निर्मिती आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे मत पर्यावरण तज्ञ प्रा. अशोक भड यांनी व्यक्त केले. आज जागतिक वसुंधरा दिनाच्यानिमित्ताने त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ही माहिती दिली.
वसुंधरा दिवस : मानवी समस्यांमुळे प्रदूषण निर्मिती आणि पर्यावरणाचा ऱ्हास - प्रा. भड
सद्या आपण मानवनिर्मित समस्यांना तोंड देत आहोत. लोकसंख्या वाढ ही भीषण समस्या बनली असून याचा निसर्गातील साधनसंपत्तीवर ताण पडत आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, की तापमान वाढ जागतिक समस्या बनली आहे. याचा परिणाम हवामान तसेच ऋतूवर पडत आहे. पर्जन्याचा काळही आता लांबलेला असून तो जुलै ते ऑक्टोबरमध्ये गेला आहे. अनिश्चित पर्जन्याचा फटका शेती व्यवसायावर झाल्याचे पाहायला मिळते. कोणत्याही देशाच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३० टक्के जंगल असणे गरजेचे असते. तरच पर्यावरणाचे जतन होऊ शकते.
पृथ्वी तलावावरील पाण्याचे साठे हळूहळू कमी होत आहेत. गंगासारख्या पवित्र नदीला आपण प्रदूषित केले. मानवाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण जतन करावे, असे आवाहनही प्रा. भड यांनी केले आहे.