नागपूर - विदर्भातील धानशेतीवर दुष्काळाचे सावट असून पाऊस नसल्याने पीक करपण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
नागपुरातील धान शेतीवर दुष्काळाचे सावट; पाऊस नसल्याने पीक करपण्याचा मार्गावर
नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. पूर्व विदर्भात साधारण ८ लाख हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार धान पीक आहे. पण यंदाच्या दुष्काळामुळे या भागातील धान रोवणीवरच मोठे संकट आल्याने जगावे की मरावे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत.
पावसाने दडी मारल्यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. मात्र, फक्त ३-४ दिवस पाऊस पडल्यामुळे याच पाऊसावर शेतकऱ्यांनी धान लागवड केली. मात्र, आता ते पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात ३० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट आहे. आज १०-१२ दिवस लोटले तरीही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.