नागपूर - शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमेनरी हिल परिसरातील आयबीएम मार्गावरील उतारावर एका धावत्या ट्रकचा ब्रेक निकामी झाला. चालकाने प्रसंगावधान राखत शेकडो जणांचे प्राण वाचवले. पण, ट्रक उलटल्याने त्याचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला. निलेश अरतपावरे, असे त्या ट्रक चालकाचे नाव आहे.
शेकडो जणांचे प्राण वाचवत 'त्याने' आपल्या प्राणाची दिली आहुती - नागपूर अपघात बातमी
धावत्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले. चालकाला उडी मारून स्वतःचे प्राण वाचवता आले असते. पण, त्याने तसे न करता शेकडोचे प्राण वाचवत आपल्या प्राणाची आहुती दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सेमिनार हिल परिसरात टीव्ही टॉवर ते आयबीएम रस्त्यावर पाईप टाकण्यासाठी महावितरणकडून खड्डे खणण्यात आले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येत होते. त्यासाठी गिट्टी (खडी) घेऊन ट्रक येत होता. हा ट्रक सेमिनार हिलच्या आयबीएम मार्गावरील उतारावरून गिट्टीखदान चौकाकडे जात असताना त्या ट्रकचे ब्रेक निकामी (फेल) झाले. अत्यंत दाटीवाटीच्या या वस्तीतील रस्ते सुद्धा अरुंद असल्याने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करत सर्वांना सावध केले. लोकांना वाचवताना पाच दुचाकी, एक रिक्षा व एका घराचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर ट्रक उलटला आणि त्याखाली चिरडून चालक निलेश अरतपावरे या तरुणाचा मृत्यू झाला.