महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामीण भागात सक्षम वैद्यकीय सुविधा उभारा; पालकमंत्री डॉ. नितीन राऊतांच्या सूचना

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. नागपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

By

Published : May 3, 2021, 7:11 AM IST

Dr. Nitin Raut on rural areas medical facilities
डॉ. नितीन राऊत ग्रामीण आरोग्य सुविधा प्रतिक्रिया

नागपूर -कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शहराप्रमाणेच ग्रामीण भागात अद्यावत आरोग्य सुविधा उभारा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. त्यांनी कोराडीच्या कोविड सेंटरला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचा संसर्गाच्या काळात आरोग्य सुविधा अपुऱ्या पडल्याने ग्रामीण भागाला शहरांकडे धाव घ्यावी लागली. परिणामी शहरातील आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला. अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी ग्रामीण भाग सक्षम केला पाहिजे असेही नितीन राऊत म्हणाले.

ग्रामीण भागात सक्षम वैद्यकीय सुविधा उभारण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या

कोराडी महानिर्मिती प्रकल्प आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कोराडीच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमुळे कोराडी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोराडी, महादुला नागरिकांना सेंटरचा फायदा सौम्य कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत झाली आहे. ही बाब समाधानकारक आहे. खाटांची संख्या 20 वरून 50 पर्यंत वाढवा तसेच येथे रुग्णांसाठी पोस्ट कोविड सुविधा उभारण्यास नवीन बांधकामासाठी प्रस्ताव पाठवण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

ऑक्सिजन प्लांट हलवण्यात यावा -

महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील 42 घनमीटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट कामठी येथील उप जिल्हा रुग्णालय हलवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी मुख्य अभियंता राजू घुगे यांना दिले. कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त 100 खाटाची संख्या करण्यासही पालकमंत्री म्हणाले.

ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन, 160 बेडला मिळणार फायदा -

कामठी रोडवरील आशा रुग्णालयाच्या परिसरातील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे ऑक्सिजन प्लांटमुळे 100 जम्बो सिलिंडरची पुर्तता होणार आहे. तसेच कोविड केअर सेंटरला 160 खाटा असून प्रत्येक खाटेला ऑक्सिजनची सुविधा झाली आहे. पीएसए या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी यावेळी दिली.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, शालिनीताई मेघे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकेश गजभिये, डॉ. संजय देशपांडे, मुख्य अभियंता राजेश पाटील, राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, राजेंद्र राऊत, तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी अंशूजा गराटे आदी यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details