नागपूर : नायलॉन मांजापासून स्वतःचं रक्षण करत दुचाकी वाहन चालवावेत. आम्ही असे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या आठ दिवसांमध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकून सहापेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. आज आणि उद्या मकर संक्रांतनिमित्त पतंगबाजीला उधाण येणार आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
गळ्यात दुपट्टा, रुमाल बांधूनच प्रवास करावा :बंदी असलेल्या नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री तात्काळ थांबवा, असे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने नागपूर पोलिसांच्या सायबर सेल दिले होते. तरी देखील अनेकांचे जीव घेणाऱ्या मांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे नागपूरकरांना सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यावर निघताना किंवा वाहन चालवताना गळ्यात दुपट्टा किंवा रुमाल बांधूनच प्रवास करावा असे सांगण्यात आले आहे.
मांजामुळे गळा कापला, १६ टाके लागले : पतंगबाजीमुळे शहरात गळा कापला जाणे याला सुरूवात झाली आहे. गेल्या आठवड्यात एका चिमुकलीचा जीव या मांजामुळे जाता जाता वाचला आहे. दुपारी शाळेतून आल्यानंतर घरापुढे खेळत असताना शबनाज खेळत असताना पतंगाचा मांजा तिच्या गळ्यात अडकला. पतंग उडविणाऱ्यांकडून तो जोरात ओढला गेल्याने शबनाजचा गळाच कापला गेला. रक्तबंबाळ झालेल्या शबनाजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. थोडक्यात तिचा जीव वाचला. तिच्या गळ्यात १६ टाके लागले होते.
मांजा वापरणार नाही, विद्यार्थांनी घेतली शपथ : ‘मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. यासोबतच पालकांनी आपला पाल्य पतंग उडवतांना कोणता मांजा वापरतो आहे. याकडे लक्ष ठेवण्याचे आणि नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पालकांना करण्यात आली आहे.
छुप्या मार्गाने नायलॉन मांज्याची विक्री सुरू : बच्चे कंपनीसोबतच सर्व वयोगटातील लोकांचा आवडता उत्सव म्हणजे पतंगबाजी उत्सव सुरू झाला आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरात पतंगबाजी सुरू झालेली आहे. मात्र,ही पतंगबाजी जेवढा आनंद देते, त्यापेक्षा अधिक दुःख, वेदना आणि त्रासदायक ठरते आहे. याचे कारण म्हणजे नायलॉन मांजा. जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना देखील छुप्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री केला जातो आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या आठ दिवसात लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. तरी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जराही कायद्याची भीती नसल्याने नायलॉन मांजा सर्रासपणे विकला जातो आहे. मात्र, आता नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांना अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे. सर्व-सामान्य नागरिकांच्या मदतीने पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
नायलॉन मांज्यावर पोलिसांची नजर :नायलॉन मांजाचा वापर होत असेलेल्या भागात ड्रोन कॅमेराच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. याशिवाय बिट- मार्शलला देखील कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. कुठे कुठे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचा आढावा घेऊन डीलर्सवर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. याचबरोबर रेकॉर्डवरील नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रासायनिक प्रक्रिया करून तयार केला जातो धागा :मकरसंक्रांतीचा सण शहरात तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नायलॅान मांजाची खरेदी आणि विक्री केली जाते. हा मांजा नायलॅान धाग्यापासून तयार करण्यात येतो. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे हा मांजा सहजा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो.
हेही वाचा :Brijbhushan Singh : राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण यांचे भाजपकडून जोरदार स्वागत