नागपूर -पूर्व विदर्भात झालेल्या पूरग्रस्तांच्या नुकसानीला आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार आहे, असा आरोप भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करून त्यांना तत्काळ मदत द्या, या मागणीसाठी नागपूर ग्रामीणच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या घरांसाठी शासनाने अडीच लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी यावेळी बावनकुळे यांनी केली.
विदर्भातील पूरस्थितीला आपत्ती व्यवस्थापनाचा गलथान कारभार जबाबदार - चंद्रशेखर बावनकुळे विदर्भात पूरामुळे अनेक गावांना आणि तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींवर तत्काळ लक्ष देऊन शासनाने भरीव मदत करावी. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने नागपूर ग्रामीण तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
विदर्भात पूरामुळे झालेल्या नुकसानीला आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. लोकांना सतर्कतेचा इशारा न दिल्यामुळे इतके मोठे नुकसान झाल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. शिवाय पूरग्रस्तांना आत्तापर्यंत कोणतीही मदत शासनाकडून मिळाली नाही. त्यामुळे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली. खरे तर ही मदत सहा दिवसांतच मिळायला हवी होती. मात्र, ती अद्यापही मिळाली नाही. शासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष होत आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
शिवाय सोयाबीन पिकाचे नुकसान शासनाच्या चुकीमुळे झाले. प्रमाणित बियाणे न दिल्यामुळे अनेक तालुक्यांत सोयाबीन पिकांवर खोटकिट रोग आले. त्यामुळे संपूर्ण विदर्भातील सोयाबीन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शासनाच्या चुकीमुळेच विदर्भात अस्मानी आणि सुलतानी संकट ओढावले आहे. या स्थितीला तत्काळ पूर्ववत करा, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीने सर्वत्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी बावनकुळे यांनी दिला.