नागपूर - महापालिकेने गेल्या चार वर्षात विविध कार्यक्रमात केलेल्या खर्चाच्या हिशेबात तफावत असल्याचे निदर्शनात आले आहे. माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती व महापालिका सभागृहात देण्यात आलेली माहिती यात मोठा फरक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
नागपूर महापालिकेच्या खर्चाच्या हिशेबात तफावत, कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय? नागपूर महापालिकेच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सांस्कृतिक, क्रीडा, महिला विषयक अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी महापालिकेकडून खर्च केला जातो. मात्र, महापालिकेने केलेला खर्च लपवण्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवलेली माहिती व याच प्रश्नावर महापालिकेच्या सभागृहात देण्यात आलेली माहिती यामध्ये बरीच तफावत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये महिला व बालकल्याण विभागासह प्रशासनाने हेरगिरी केल्याचे दिसून येत आहे.
नगरसेवक संदीप सहारे यांनी 2017 ते 2019 पर्यंत महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम, शिबीर, प्रदर्शने, जनसंवाद कार्यक्रम यासंबधीची माहिती महापालिकेकडे मागितली. यानुसार महापालिकेने विविध कार्यक्रमांवर 5 कोटी 54 लाख रुपये खर्च झाल्याचे आरटीआय अंतर्गत सांगण्यात आले. मात्र, हाच प्रश्न सभागृहात उपस्थित केल्यावर 2 कोटी 44 लाख खर्च झाले, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे खरी माहिती कोणती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
महापालिकेतर्फे महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात येतो. आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीत हा खर्च दीड कोटींवर आहे, तर सभागृहात हा खर्च केवळ 7 लाखांचा सांगण्यात आला. याचप्रमाणे अन्य कार्यक्रमाच्या खर्चाच्या हिशेबात देखील तफावत दिसून येत आहे. शिवाय लहान कार्यक्रमाच्या आयोजनावर देखील मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकूणच महापालिका प्रशासनाच्या या कारभाराची चौकशी होण्याची गरज आहे. महापौरांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता चौकशी अहवालात काय समोर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.