नागपूरDharavi March Issue: धारावीबाबतचे टेंडर द्यायला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोध होता. मग पूर्वी काढलेले टेंडर रद्द का केले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधिमंडळात उपस्थित केला. जे लोकं आरोप करताहेत त्यांनी समजून घेतले पाहिजे की, सूचना व हरकती आम्ही जाहीर केल्या होत्या. पण फक्त आरोप करायचे एवढेच त्यांना माहीत आहे. मातोश्री एक व मातोश्री दोन असा आपला अभिमानस्पद प्रवास आहे. तसा धारावीचा देखील प्रवास झाला पाहिजे. त्यांना न्याय देऊ शकत नाही, तर किमान आरोप करणे तरी सोडा, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde)
शेवटच्या दिवशी या मुद्द्यांवर चर्चा :हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी मविआ सरकारमधील घोटाळा, भ्रष्टाचार, कोविड काळातील घोटाळा, मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार, धारावी मोर्चा, मुंबईतील प्रदूषण, पेंग्विन घोटाळा, ड्रग्ज, गुन्हेगारी आदी मुद्द्यावर बोलत मविआ, ठाकरे गट, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली. तसेच आपल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार कसा कमी केला आणि विकासकामांना कशी गती दिली, याचा पाढा देखील मुख्यमंत्र्यांनी वाचला.
रोड बनविणाऱ्या कंपनीला पेंग्विनचे कंत्राट :अंतिम आठवडा प्रस्तावाच्या सुरुवातीला बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले. पालिकेनं परदेशातून पेंग्विन आणले. पण पेंग्विनसाठी जी इमारत तयार करण्यात आली आहे, तिचे कंत्राट एका रोड बनविणाऱ्या कंपनीला देण्यात आले. याचे काम रोमिला छेडाला दिले. याला ५७ कामं देण्यात आली. रोमिला छेडाचे कपड्याचे दुकान आहे. त्याला कसलाही कामाचा अनुभव नाही. तरीपण फक्त मर्जीतील लोकांना युवासेनेतील नेत्यांनी कंत्राट देण्यात आले. या कामात लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आला, अशी टीका आदित्य ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
जिथे टेंडर, तिथे सरेंडर :कोविड काळात पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळण्यात आला. मविआ काळात सूड भावनेनं अनेक प्रकल्प रखडवले गेले. आम्ही अनेक पायाभूत सुविधांना चालना दिली. रोज आम्हाला आरोपींच्या पिजऱ्यात उभे केले जाते. आमच्यावर दररोज टीका केली जाते. कपड्याचे दुकान असणाऱ्या रोमिला छेडाला ऑक्सिजन प्लॅट्चे काम दिले गेले. हे कसे दिले गेले हे मला अद्याप कळले नाही, असा घणाघात मुख्यमंत्री शिंदेंनी मविआ सरकार व ठाकरे गटावर केला. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे टेंडर, तिथे सरेंडर अशी भूमिका त्यांची आहे.
लाखो-करोडो रुपयांची बिलं पास केली :पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, कोविड काळात पालिकेत ठाकरे गटाची सत्ता असताना मोठा भ्रष्टाचार झाला. खिचडीत मोठा घोटाळा झाला. ३०० ग्रॅम खिचडीसाठी कंत्राट दिले गेले. पण प्रत्यक्षात खिचडी मिळाली १०० ग्रॅम. कोणाच्या खात्यात किती पैसे गेले, हे सर्व रेकॉर्डवर आहे. हे सर्व बाहेर येईल. यातील साळुंखे, पाटकर आणि कदम आदी नावे संबंधित आहेत. तपासात सर्व गोष्टी बाहेर येतील. तुम्ही मापात पाप केलं. गरिबांच्या तोंडचा घास पळवून नेला. त्यांना लोकांच्या जीवाचे काही पडले नाही. त्यांना फक्त पैशांशी मतलब आहे. कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाला. यादरम्यान अनेक कामात लाखो, करोडो रुपयांची बिलं पास करण्यात आली. याची चौकशी करण्यात येईल, असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला दिला.
महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला:सामान्य माणूस जगण्यासाठी धडपडत असताना, यांच्याकडे पैशांचे मोजमाप सुरू होते. रेमडिसिव्हर, ऑक्सिजन आदी घोटाळे कोविडकाळात झाले. अनेक लोकांनी रेमडिसिव्हर विकत घेऊन लोकांना मदत केली. दोन लाख रेमडिसिव्हरसाठी अधिकचे पैसे देऊन महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला. या पैशांचा बुस्टर डोस कोणाला मिळाला? हे तपासात बाहेर येईल. किमान कोविड काळात तरी असे झाले नाही पाहिजे होते. पण हे दुर्दैव आहे. निविदा काढून कोविड सेंटरची अनियमतपणे उभारणी केली. याचे कंत्राट स्वत:च्या मर्जीतील लोकांना दिले. यात देखील घोटाळा झाला आहे. या सर्वांची चौकशी करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले.
घरी बसून देशातील नंबर १ मुख्यमंत्री कसे?मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारमध्ये कशी चांगली कामं झाली याचा देखील उल्लेख केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या योजनेचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आलं. मविआ सरकारने लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. येथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा. अन्यथा याच्यापेक्षा अधिक आमच्या पोतडीत तुमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. कोविडकाळात घरी बसून देशातील नंबर वन मुख्यमंत्री असल्याचे दाखवले. पण मी म्हणतो आरे घरी बसून नंबर वन मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो? असा सवालही मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थित केला.
हेही वाचा:
- लालू पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून समन्स; 'या' घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं
- सरकारला फक्त 'मन की बात' करायची आहे, त्यांना 'जन की बात' ऐकायची नाही - डॉ. अमोल कोल्हे
- साईबाबा संस्थानला विदेशी चलन का ठरतयं डोकेदुखी? तर 'हे' आहे कारण