नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. निवडणुकीच्या शपथ पत्रात माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी २४ जानेवारीला पुढील सुणावणी होणार आहे. फडणवीस यांना न्यायालयाने पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक शपथ पत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा हेही वाचा -डॉ. रुपा कुलकर्णी : असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी सावित्रीची लेक
निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करताना फडणवीस यांनी शपथपत्रात त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करणारी याचिका अॅड. सतीश उके यांनी दाखल केली होती. शनिवारी या याचिकेवर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने फडणवीस यांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. शिवाय विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपून काढले असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी ते शेतकऱ्यांसोबत व्यस्त असल्याने ते सुनावणीला हजर राहू शकत नसल्याचे फडणवीस यांचे वकील उदय डबले यांनी सांगितल्यानंतर याचिकाकर्ते सतीश उके यांच्या बाजूने आपली भूमीका मांडत असलेले अॅड. सुदीप जैस्वाल यांनी आक्षेप नोंदवला.
हेही वाचा -खून करून 'ती' गेली पोलीस ठाण्यात; गुन्हाची दिली कबूली
या मुद्यावर न्यायालयाने दोन्ही पक्षाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने फडणवीस यांना 24 जानेवारीपर्यंत दिलासा दिला आहे. मात्र त्यांना २४ जानेवारीला उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले असून त्यावेळी फडणवीस पुन्हा गैरहजर राहिल्यास कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.