नागपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाला अगोदरच महामारी म्हणून घोषित केलेले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असेल आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या असतील तर त्यावर केंद्रसरकार नक्कीच विचार करेल, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर विमानतळाबाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'मुख्यमंत्र्यांच्या काही अपेक्षा असतील तर केंद्र सरकार नक्कीच विचार करेल' - देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे पत्र प्रतिक्रिया
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रानेही या महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत गरजू लोकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
!['मुख्यमंत्र्यांच्या काही अपेक्षा असतील तर केंद्र सरकार नक्कीच विचार करेल' Devendra Fadnavis](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11420345-799-11420345-1618536043716.jpg)
नाना पटोले सत्तेत की विरोधात -
नाना पटोले हे केंद्रावर टीका करतात. राज्यात शेतकरी, सलून धारक, फूल विक्रेते, मासळी विक्रेत्यांना मदत करावी, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. राज्यातील छोट्या व्यावसायिकांचा विचार झाला पाहिजे, अशी ते भूमिका घेतात. यावरून नाना पाटोले हे सत्ताधारी पक्षात आहे की विरोधात हेच कळत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला.
भूकंप, पाऊस आणि पूर आल्यास नैसर्गिक आपत्ती जाहीर करून बाधितांना आर्थिक मदत दिली जाते. कोरोना सुद्धा त्याच पद्धतीनटा आहे. यामुळे कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांच्यावतीने पंतप्रधानांना पत्र देणार आहेत.