नागपूर - लॉकडाऊन हा पर्याय नाही. मात्र, प्रशासनाला असे वाटत असेल, तर आम्ही त्याला टोकाचा विरोध न करता त्याबाबत विचार करू, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक आयोजित केली आहे. बैठकीआधी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ -
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात रुग्णसंख्या अधिक आहे. आता मृत्यूची संख्यासुद्धा वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे. लॉकडाऊन आणि उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोरोनामुळे जे रुग्ण रुग्णालयात आहे त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मोठ्या प्रमाणात रुग्ण हे लक्षणविरहित आहे. यात लक्षण नसलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याचा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. या परिस्थितीत खाटा उपलब्ध होण्याचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यासोबत जे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे, त्यांच्या बिलाचा प्रश्न पुन्हा नव्याने समोर येत आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. यात प्रशासनाला या संदर्भात पूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा -कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश