नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये 'मी पुन्हा येईल' असे वक्तव्य केले होते, परंतु त्यानंतर त्यांचे सरकार आले नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. शनिवारी एका कार्यक्रमात कवी मनाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघायला मिळाले. त्यांनी अनेक कवितांची रचनादेखील केली आहे. भाजपच्या बैठकीत आवर्जून शेवटच्या बाकावर बसून त्यांनी कविता रचल्या आहेत. परंतु २०१९ साली रचलेली कवितेमुळे मोठी अडचण झाल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले मीसुद्धा विधानसभा निवडणुकीत पुन्हा येईल, अशी कविता म्हटली होती. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल असे म्हटले होतो. त्यावेळेस मला माहिती नव्हते की, इतकी अडचण होईल.
काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा : कविता म्हटली तेव्हा लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. आठ-दिवसात दहा भाषेत अनुवाद करून टाकले. त्याच्यानंतर आमचे सरकार आले नाही. या कवितेमुळे सरकार आले नाही, असे देखील अनेकांनी सांगितले. शेवटी मला हे सांगावे लागले की, मी जे पुन्हा येईन म्हटले होते. त्यानुसार मी तर आलोच आणि इतरांनाही सोबत घेऊन आलो. परवा अजून एकाला सोबत घेऊन आलो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांचा तिसरा काव्यसंग्रह 'दिक्कालाच्या मांडवात' तसेच, 'काठावर दूर नदीच्या' या त्यांच्या प्रथम काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.